E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
एका घरकुलाची गोष्ट
Samruddhi Dhayagude
31 Mar 2025
विरंगुळा : प्रा. डॉ. श्रीकांत तारे
इंदूर
इतर लेखकांप्रमाणे कुठल्याही लेखाची किंवा कथेची सुरुवात करताना माझ्याही डोक्यांत विचारांची गर्दी होते. हे लेखन पूर्ण केल्याशिवाय आता पाणी प्यायलाही थांबायचं नाही, असं मनाशी पक्कं ठरवून मी सुरुवात करतो, आणि.... आणि लिहिता लिहिता मध्येच अडखळतो. माझ्या खोलीत काही कामानिमित्त आलेली सून माझ्याकडे आश्चर्याने बघते, काळजीनं ‘पप्पा, रडायला काय झालं?’ विचारते. माझ्या चेहर्यावरचं स्मित बघून अधिकच बावचळून जाते. मी लॅपटॉपच्या स्क्रीनवर नजर टाकतो, समोरची अक्षरं धूसर होत जातात...
अगदी साधी, कुणाच्याही घरांत घडावी अशी ही घटना. रविवारी सकाळी मी एका कवितांच्या कार्यक्रमाला फक्त कविता ऐकायला गेलो होतो. आता माझं वय झाल्यामुळे म्हणा किंवा माझे केस पांढरे झाल्यामुळे असेल कदाचित; पण आयोजकांनी मला ‘दोन शब्द’ बोलायची विनंती केली आणि मनातून सुखावून जात ‘मला कशाला उगाच?’ म्हणून लटके आढेवेढे घेत ऐनवेळेस जमेल तितकं आणि जमेल तसं बोलून मी वेळेवर आटोपतं घेतलं. मग जेवण, पाठोपाठ कवीमित्रांशी गप्पा, शेवटून छोट्याशा औपचारिक कार्यक्रमांत स्मृतिचिन्हांचं देवाण घेवाण यात दुपारचे तीन वाजले. सुबकश्या पुड्यात पॅक केलेलं, निमुळत्या सोनेरी लेखणीचा आकार दिलेलं स्मृतिचिन्ह घेऊन मी घरी परतलो तेव्हा चार वर्षाचा प्रणम्य त्याच्या बाबाच्या कुशीत झोपून गेला होता. खरं तर त्याची शाळा सुरू झाल्यापासून रविवारसकट कुठल्याही सुटीचा दिवस मी फक्त त्याच्यासाठी राखून ठेवलेला आहे, परंतु मला ‘आत्ता दवाखान्यांत जावून येतो’ असं त्याला खोटं सांगून सकाळी निघावं लागलं आणि त्याला फसवल्याची ही जाणीव मला सातत्याने टोचत राहिली. घरांत समोर पलंग दिसला अन् मलाही थोडसं आळसाटल्यासारखं झालं. मी मग अर्धा पाऊण तास लोळलो. उठल्यावर चहा, हिच्यासमोर कार्यक्रमाचं रिपोर्टिंग वगैरे. यातच पाच वाजले.
मी आल्याचं प्रणम्यला खाली कळलं आणि एक जिना चढून तो माझ्या खोलीत शिरला. मी त्याला जवळ बोलावलं, कुशीत ओढून घेतलं, तो माझ्यावर रागावलेला दिसत होता. आजकाल तो रागावला की, त्याची दखल घ्यावी लागते, आपण त्याच्याकडे लक्ष नाही दिल,ं तर तो चारचारदा ‘मी तुझ्यावर रागावलोय’ असं सांगतो. त्याची आई त्याच्या रागाकडे दुर्लक्ष करायला सांगते. मी मात्र त्याला जवळ घेत पोटाशी धरतो, तोही बेटा याच क्षणाची वाट पाहत असल्यासारखा पटकन माझ्या गळ्यात दोन्ही हात गुंफून घेतो. त्याच्या डोक्यावरून हात फिरवीत मी त्याला ‘आबावर खूप रागावलास काय रे बबड्या?’ विचारतो आणि उत्तरादाखल माझ्या गालावर गाल घासून तो हळूच ‘अंहं’ म्हणतो. आम्हा आबा नातवाचा हा खेळ आजवर कितीतरी वेळा खेळून झालाय आणि तरीही आम्हा दोघांना हा खेळ पुन्हा पुन्हा खेळावासा वाटतो.
आताही त्यानं माझ्या गळ्यात हात टाकले, ‘कुठे गेला होतास दिवसभर?’ विचारलं. ‘अरे, खूप कामं होती मला.’ मी काहीतरीच कारण सांगितलं. त्याला पटलं नाही, पण आबा म्हणतोय तर असेल कदाचित म्हणून राग विसरून तो माझ्या कुशीतून बाजूला झाला. ‘काय आणलंस माझ्यासाठी?’ त्याचा पुढला प्रश्न. मी त्याच्यासाठी काही आणलं नसल्याने कारण शोधू लागलो तेवढ्यांत त्याचं लक्ष मला मिळालेल्या स्मृतिचिन्हाच्या खोक्याकडे गेलं. मी ‘अरे त्याला हात लावू नकोस’ म्हणेपर्यंत त्यानं झेप घेत जाड कागदाचं ते खोकं हस्तगत केलं, त्यातून स्मृतिचिन्ह काढून ‘हे आणलंस माझ्यासाठी?’ विचारलं. माझा होकार गृहीत धरून ‘आबाने माझ्यासाठी बघ काय आणलं’ असं ओरडत घरातील इतर सदस्यांना ‘त्याची’ खास वस्तू दाखवण्यासाठी तो वेगाने खोलीतून बाहेर पडला. मी त्याच्या मागे धावलो. हळुवार मनाच्या कवींच्या कार्यक्रमाची आठवण म्हणून दिलं गेलेलं नाजूक स्मृतिचिन्ह होतं हे, नुसतं खाली जरी पडलं असतं तरी शोकेसमध्ये ठेवण्याआधी त्याला श्रद्धांजली अर्पण करावी लागली असती. मग प्रणम्यने ते स्मृतिचिन्ह घरातील प्रत्येकाला ‘माझंय’ म्हणत दाखवलं. मला वाटलं, कौतुक सरलं की, मला माझी वस्तू परत मिळेल, पण त्याने ‘मी उद्या माझ्या मॅडमला दाखवायला हे शाळेत नेणार आहे’ असा निश्चय बोलून दाखवला आणि मी सावध झालो. अचानक मला एक कल्पना सुचली. त्याचं लक्ष वळवण्यासाठी मी एक जिना चढून वर जाऊन स्मृतिचिन्हाचा रिकामा खोका घेऊन आलो, ‘चल बाळा, आपण याचं घरकुल बनवूया’ म्हटलं. नवीन काहीतरी उपक्रम सुरू होतोय म्हटल्यावर तोही तयार झाला. हातातील स्मृतिचिन्ह त्याने त्याच्या आजीकडे दिलं, ‘आजी, तू लपवून ठेव, आबांना देऊ नकोस’ अशी सूचना देऊन तो माझ्यासोबत पुन्हा वरच्या मजल्यावर आला. ब्लेड, स्केच पेन, कात्री, फुटपट्टी आणि डिंक घेऊन आम्ही खालीच बसकण मारली, बाळ एकदम उत्साहात आलं. खोक्याचं घर वाटावं म्हणून त्याच्या मधोमध कापून मी घराचं दार तयार केलं, बाजूला एक खिडकी, प्रकाश आत येण्यासाठी मागल्या बाजूला तावदान. खिडकीला, दाराला रंगीत कागद डकवला, आणि दुसरा मजला तयार करण्यासाठी मी त्या खोक्याला स्केच पेनने मधोमध जाडशी आडवी रेघ मारली. ‘हे काय करतोयस आबा?’ प्रणम्य विचारता झाला. ‘काही नाही रे, आता आपण तयार केला तो खालचा मजला. इथे तू, तुझी आई आणि तुझा बाबा राहणार. आत्ता मी आणि आजी वरच्या मजल्यावर राहतो ना, म्हणून याही घराला वरचा मजला तयार करतोय.’ मी उत्तर दिलं.
बस, मी एवढं बोललो आणि प्रणम्यने खोक्यावर हात ठेवला. दुसरा हात आणि मान नकारार्थी जोरजोराने हलवत तो ओरडला ‘आबा, तू हे असं घर बनवूच नकोस.’ मी आश्चर्याने त्याच्याकडे बघतच राहिलो. ‘आबा’ तो पुढे म्हणला ‘आपल्या सर्वांना एकाच मजल्यावर राहता येईल असं घर बनव ना, आपण नेहमीच एकत्र राहूया, आपण झोपायचं पण एकाच घरांत म्हणजे रात्री पण तुला आणि आजीला वर जायला नको’. त्याचा स्वर रडवेला झाला, कुठल्याशा अनामिक शंकेनं तो माझ्या गळ्यात पडला, माझ्या गालाला त्याचे गाल लागले. मी त्याला घट्ट घट्ट मिठीत घेतलं, काय बोलावं हे मला सुचेना. हे कौतुक हिला, सुनेला सांगावं म्हणून मी त्यांना हाक मारायला गेलो तर गहिवर दाटून आल्याने माझा आवाज घशातच अडकला.
जरा वेळानं त्याच्या आईची हाक आली म्हणून प्रणम्य खाली गेला आणि या घटनेची कथा करायची असा विचार करीत मी लॅपटॉप ऑन केला, कथा पूर्ण होईस्तोवर मध्ये कुठे थांबायचं नाही असं ठरवून लिहायला सुरुवात केली, दोन ओळी लिहिल्या आणि अचानकच समोरची अक्षरं धूसर होत गेली, मी लिहिणं थांबवलं...
....भरल्या डोळ्यानं लिहू शकणारा लेखक अजून जन्माला यायचाय.
Related
Articles
वक्फ मंडळ म्हणजे काय?
03 Apr 2025
कुणाल कमरा याला तिसरी नोटीस
03 Apr 2025
सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के
03 Apr 2025
वाचक लिहितात
04 Apr 2025
विजयानंतर मुंबईची क्रमवारीत मोठी झेप
02 Apr 2025
महामार्गावरील टोल दरात वाढ
02 Apr 2025
वक्फ मंडळ म्हणजे काय?
03 Apr 2025
कुणाल कमरा याला तिसरी नोटीस
03 Apr 2025
सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के
03 Apr 2025
वाचक लिहितात
04 Apr 2025
विजयानंतर मुंबईची क्रमवारीत मोठी झेप
02 Apr 2025
महामार्गावरील टोल दरात वाढ
02 Apr 2025
वक्फ मंडळ म्हणजे काय?
03 Apr 2025
कुणाल कमरा याला तिसरी नोटीस
03 Apr 2025
सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के
03 Apr 2025
वाचक लिहितात
04 Apr 2025
विजयानंतर मुंबईची क्रमवारीत मोठी झेप
02 Apr 2025
महामार्गावरील टोल दरात वाढ
02 Apr 2025
वक्फ मंडळ म्हणजे काय?
03 Apr 2025
कुणाल कमरा याला तिसरी नोटीस
03 Apr 2025
सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के
03 Apr 2025
वाचक लिहितात
04 Apr 2025
विजयानंतर मुंबईची क्रमवारीत मोठी झेप
02 Apr 2025
महामार्गावरील टोल दरात वाढ
02 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आरक्षणाचे राजकारण
2
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
म्यानमार, थायलंडला भूकंपाचा धक्का
5
लाडके ‘खास’(अग्रलेख)
6
वाचक लिहितात